Wednesday 15 April 2015

भगवंतस्वरूप धर्ममूर्ती डाॅ. बाबासाहेब आंबेडकर


यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत
अभ्युत्थानमधर्मस्य तदात्मानं सृजाम्यहम् ।। गीता - .
ह्या भरतभूमीवर जे अनेक महामानव होऊन गेले त्यांतील डाॅ. बाबासाहेब आंबेडकर हे शेवटचे म्हणता येतील. शेवटचे इतक्याच अर्थाने की त्यांच्यानंतर अजून तरी त्या उंचीचा मानव आपल्यांत जन्माला आलेला नाही. पुढे येणार नाही असे नाही. परंतु, त्यासाठी धर्माला पुरी ग्लानी येऊन अधर्म माजलेला असावा लागेल!
श्री व्यासमहर्षींनी अशी कल्पना मांडली की समाजाची जेव्हा विलक्षण अवनती होते तेव्हा जो स्वतःला अजन्मा अकर्ता मानतो, त्या निराकार भगंवताला साकार व्हावे लागते धर्म टिकेल हे पाहावे लागते. गेले काही दिवस ह्याचा अर्थ विस्ताराने मांडण्यात त्यावर विचार करण्यात दिवस जात असता डोळ्यासमोर सतत बाबासाहेबांचीच मूर्ती उभी राहत होती अवघ्या भारताला त्यांनी धर्म कसा शिकविला हे लक्षात येऊन कृतज्ञता दाटत होती.
बाबासाहेब झाले नसते तर ही कल्पना करवत नाही. इंग्रजांचे राज्य आमच्यावर धर्मज्ञान लोपल्यानेच आले होते आणि त्याचेच अस्पृश्यता हे उघड आणि महाविकृत स्वरूप समाजात स्थिरावले होते. धर्म आणि अधर्म यांतील सीमारेषा अस्पष्ट होत जाऊन शेवटी सारेच अधर्ममय झाले होते याचा ह्याहून अधिक पुरावा नको.
तो अधर्म मोडून काढण्यासाठी भगवंताला अस्पृश्यांतच अवतार घ्यावा लागला. 
भगवंत जणू स्पृश्यांना म्हणाला, 
"
तुम्ही माझ्या नावे माझ्याच काही लेकरांची जी अवस्था केली आहेत ती मी त्यांच्यात जन्मून सुधारेन. मी स्पृश्य अस्पृश्य असा भेद मानीत नाही. तसे मानले तर मी एकजिनसी निर्मल राहायचा नाही आणि माझे भवगंतपणही लयाला जाईल. मी एक आहे आणि मीच सर्वांमध्ये आहे. मी सर्वांमध्ये आहे म्हणून सारे सारखेच निर्मल आहेत. तुम्ही भेदभाव करता याचा अर्थ तुम्ही मला एक मानीत नाही असा होतो. तुम्ही ज्या क्षणी माझे एकत्व विसरलात त्याच क्षणी तुमची अवनती सुरू झाली. त्या अवनतीची अस्पृश्यता ही सीमा झाली. पूर्वी अनेकवार अवतार घेऊन मला त्या त्या वेळी माजलेला अधर्म मोडून काढावा लागला आहे. आताही ही वेळ आली असून मी तुमच्यातील एक मानव बनून, तुमचे प्रबोधन करीन.
मी अस्पृश्यांत जन्म घेऊन हे दाखवून देईन की धर्म सर्वांना समान समजतो. किंबहुना, जो समान समजत नाही तो धर्मविचारच नव्हे. ज्याने समाजाची धारणा होते त्याला धर्म म्हणतात. ज्यांत प्रत्येकाला ऐहिक आणि आध्यात्मिक उन्नतीची संधी आहे त्याला धर्म म्हणतात. मी माझ्या त्या मानवरूपांत अशी उन्नती साधून दाखवीन."
खरोखर, बाबासाहेबांचे जीवन पाहिले तर ते साक्षात धर्ममूर्ती होते असेच वाटेल. वर दिलेली धर्माची व्याख्या आणि धर्माचे कारण तेच आहे जे बाबासाहेबांना मान्य आहे. बाबासाहेबांनी अवघ्या भारतीयांना धर्मशिक्षण दिले. 
बाबासाहेब झाले नसते तर समाजातील एका वर्गाची उन्नती झाली नसती असे म्हणणे मूर्खपणाचे आहे. शरीराच्या एका अवयवाला तर कर्करोग झाला आहे असे म्हणण्याइतके ते बुद्दूपणाचेही आहे.
बाबासाहेबांचे उपकार एका वर्गावर नाहीत तर सर्वांवर आहेत. त्यातही जे अधर्म करीत होते त्यांच्यावर अधिक आहेत. बाबासाहेब नसते तर हा अधर्म असा आटोक्यात आला नसता आणि पापाचे घडे भरून विनाशच ओढवला असता.
भगवंतस्वरूप धर्ममूर्ती बाबासाहेबांनी ह्या भारतदेशासाठी बरेच काही केले. त्यातील एकाच कार्याबद्दल लिहिले आहे कारण कार्यांची यादी दिली तरी ग्रंथ होईल! 
आजच्या त्यांच्या जयंतीनिमित्त त्यांना अभिवादन करावे कृतज्ञता व्यक्त करावी म्हणून ह्या चार ओळी लिहिल्या.


2 comments:

  1. विजय कुमार अश्या प्रकारे इतिहासाची विकृति करने थांबवा बाबासाहेबांना हिंदुत्वाशी जोडण्याचा हां अतिशय घृणास्पद आणि निंदनीय लेख आहे

    ReplyDelete
  2. विजय कुमार अश्या प्रकारे इतिहासाची विकृति करने थांबवा बाबासाहेबांना हिंदुत्वाशी जोडण्याचा हां अतिशय घृणास्पद आणि निंदनीय लेख आहे

    ReplyDelete